मराठा विद्या प्रसारक समाज. जी.एम.डी. कला,बी .डब्लू वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर |
![]() |
Maratha Vidya Prasarak Samaj. G.M.D. Arts, B.W. Commerce And Science College, Sinnar |
जनकल्याणी देह झिजवूनी लाजविले चंदना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना
तुम्हाला लाख लाख वंदना ||धृ.||
ऋषिराजाने राजर्षी लावियली ज्योत
वसा ज्योतीचा घेऊनी साचा पेटविला पोत
दिशादिशांतून घराघरांतून आली नवजाग
दिसू लागला मनामनातला मुक्तीचा मार्ग
निद्रेतच होते दंग
अंतरातले स्फुर्लिंग
ते उठले उधळीत रंग
बहुजन हिताय, बहुजन सुखाय चेतविली चेतना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||१||
नांगर टाका भाला फेका शिकवी शिवराया
त्याच मातीवर कसुनी कंबर करुया नव किमया
निरलस श्रमुनी काढू खणूनी रुतलेली शल्ये
निष्ठा शिंपून करु पेरणी हवी नवी मूल्ये
दृढ निश्चय ऐसा करुनी
कार्यात प्राण ओतुनी
आयुष्य दिले झोकुनी
ज्ञानप्रशाला उभारण्याला दिलीत हो प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||२||
मूक अडाणी फुलवू अग्रणी त्यातूनी ही जिद्द
मुळात अबला करु या सबला धन्य धन्य ब्रीद
दिव्य थोरवी कुठली ओवी गुंफावी गौरवा
नम्रपणाने एक मागणे हट्ट हाच पुरवा
निरपेक्ष अपुली कृती
ती सेवाभावी मती ती
निष्ठा तसली ध्रुती
समाजदिन हा सार्थ कराया द्या हो द्या प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||३||
- कै.प्रा. श्रीरंग गुणे